पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे आयुक्त राजीव जाधव यांनी ‘जाता-जाता’ पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’ त समावेश व्हायला पाहिजे होता, अशी भावना व्यक्त केली होती. नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही, शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (१३ मे) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसाठी पुण्यात बैठक होणार आहे. यासंदर्भातील तयारीचा आढावा आयुक्त वाघमारे यांनी घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, पिंपरी-चिंचवडचा गुणांच्या आधारावर स्मार्ट सिटीत समावेश व्हायला हवा होता. कारण, आपली बाजू बळकट होती. केंद्र सरकारने ठरवले तर अजूनही ते होऊ शकते. या स्पर्धेतून एखाद्या शहराने माघार घेतल्यास त्या जागेवर पिंपरी-चिंचवडचा समावेश व्हावा, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यसरकारने आमचे म्हणणे केंद्रापर्यंत पोहोचवावे. पुणे व पिंपरीचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्यात आल्यामुळे आपली संधी हुकली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत २४ तास पाणीपुरवठा, स्वच्छ शहर, मोशी कचरा डेपो, ताथवडे विकास आराखडा, बोपखेल, प्राधिकरणातील प्रश्न आदी विषयांवर चर्चा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.