पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी आकुर्डीत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. त्याच्या नियोजित जागेची महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पाहणी केली. आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी आगमन होणार आहे. या दिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये २० जून रोजी आगमन होणार असून त्याच दिवशी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही सोहळ्यांच्या स्वागताची महापालिकेकडून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त सिंह यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणाची आणि वारकरी भवनाच्या नियोजित ठिकाणांची पाहणी करून आढावा घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरातून जाते. पालखीचा दुसरा मुक्काम आकुर्डीत असतो. येथे वारकरी भवन उभारण्याची वारकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पांडुरंग काळभोर सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वारकरी भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे. या जागेची महापालिका आयुक्त सिंह यांनी पाहणी केली. वारकरी भवनामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासाची सोय होणार आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुक्कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावरील तसेच पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्यात यावा. पालखी विसाव्याच्या व मार्गाच्या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी. पावसाचे पाणी कुठेही तुंबणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.