पिंपरी : एक लाखाचे कर्ज घेऊन चार लाखांची परतफेड केली असतानाही सावकाराकडून पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार २५ ते २६ जूनदरम्यान चाकण येथील नाणेकरवाडीत घडला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार पसार आहेत.

संतोष हरिभाऊ नाणेकर (वय ४२, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. विकास ऊर्फ बाली अशोक परदेशी (रा. चाकण), अतुल मोहन रिठे (रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह दोन साथीदारांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संतोष नाणेकर यांच्या पत्नी जयश्री (वय ३८) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यांनी विकास याच्याकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात संतोष यांनी त्याला कोरे धनादेश दिले होते. संतोष यांनी एक लाखावर चार लाख रुपये अशी चौपट रक्कम भरूनही विकास आणि अन्य आरोपी पैशासाठी धमक्या देत होते. या त्रासाला कंटाळून संतोष यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयाच्या लक्षात येताच त्यांनी संतोष यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. संतोष यांची प्रकृती चिंताजनक असून, बाणेर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फौजदार संदीप बोरकर तपास करीत आहेत.