चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक सध्या प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपा आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने आपला उमेदवार मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहेत.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून रावसाहेब दानवे हे कोपरा येथे सभा घेणार आहेत तर नाना काटेंसाठी राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भास्कर जाधव, धनंजय मुंडे आणि रोहित पाटील यांची सभा आयोजित केली आहे. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे अशीच लढत पाहायला मिळत आहे. चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना भाजपा आणि महाविकास आघाडीकडून प्रचार करण्यावर जोर दिला जात आहे. अनेक मातब्बर आणि दिगग्ज नेते चिंचवड मतदारसंघात दिसत आहेत. दोन्ही पक्षासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार हे नाना काटे यांच्यासाठी ठाण मांडून असून त्यांचे विशेष लक्ष या पोटनिवडणुकीवर आहे.

हेही वाचा >>> “कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपा पराभूत होणार, हे अमित शाहांनी हेरलं”, रोहित पवारांचा टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या भाजपाला हद्दपार करा असे आवाहन जनतेला केले. अजित पवारांनी अपक्ष असलेल्या उमेदवाराचे नाव घेणे देखील टाळले. तर, भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रचार सभा घेतल्या. महाराष्ट्राची वाघीण चिंचवडच्या वाघिणीसाठी आली असून अश्विनी जगताप यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले होते. हे सर्व वातावरण पाहता पुढील दोन दिवस दोन्ही पक्षासाठी महत्वाचे ठरणार आहेत. चिंचवड मतदारसंघात भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्यातच लढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार की, आणखी कोणी बघावे लागणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.