पिंपरी : ताथवडे परिसरात वास्तव्यास असलेल्या बिहार आणि झारखंड येथील कामगारांमध्ये मद्यपान केल्यानंतर मोठ्याने बोलू नका म्हटल्याने हाणामारी झाली. या घटनेत झारखंड येथील एका कामगाराच्या डोक्यात लोखंडी हुक लागल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
मसीह सोमरा मुंडा (४०, ताथवडे. मूळ रा. झारखंड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुकरा संगा इतवा मुंडा (२१, ताथवडे. मूळ रा. झारखंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माणिकचंद अकालू परिहार (२०), आनंद सुधीर परिहार (२०), मिथुन उमेश परिहार (३२), ब्रह्मदेव सेलटू परिहार (१८, ताथवडे. मूळ रा. बिहार) यांना अटक केली आहे.
याच्या परस्परविरोधात मिथुन उमेश परिहार (३२) याने फिर्याद दिली असून त्यानुसार महादेव मुंडा, विजय मुंडा, तागू हुरो, शाम मुंडा यांना अटक करण्यात आली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार आणि झारखंड येथील कामगार अशोकनगर ताथवडे येथील एका मजूर वसाहतीमध्ये राहतात.
दोन्ही गटांतील कामगार रविवारी रात्री आपापल्या खोल्यांमध्ये मद्यपान करित होते. मद्यपान करित असताना दोन्ही गटांतील कामगार आरडाओरडा करत होते. त्यामुळे दोन्ही गटांतील कामगारांनी एकमेकांना मोठ्याने ओरडू नका, असे सांगितले. त्यावरून दोन्ही गटांत भांडण सुरू झाले. बिहार येथील कामगारांनी खैरा हुरो याच्या डोक्यात लोखंडी हुक मारून गंभीर जखमी केले. तर मसीह मुंडा याच्या डोक्यात लोखंडी हुक मारून त्याला ठार मारले.
तसेच झारखंड येथील कामगारांनी बिहार येथील कामगार आनंद, माणिक, करण आणि शंकुमार परिहार यांना लोखंडी पाईप, हातोडी आणि हूकने मारून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.
पादचारी महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू; एकास अटक
भरधाव मोटारीने एका पादचारी महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली आहे. हा अपघात तळवडे येथील टॉवर लाईन येथे घडला.
संध्या माधव मडीवाल (४९, लातूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संध्या यांचे जावई श्याम मल्लिकार्जुन भातके (३१, त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालक विनायक श्रीपती जगताप (३८, निघोजे, खेड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक याने त्याच्या ताब्यातील मोटार भरधाव वेगाने चालवली. टॉवर लाईन त्रिवेणीनगर येथे संध्या या पायी चालत जात होत्या. त्यांना मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात न नेता किंवा अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात संध्या यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.
पोलिसात तक्रार केल्याने महिलेला मारहाण
पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून दोघांनी मिळून एका महिलेला मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला देखील मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी खंडोबामाळ, भोसरी येथे घडली.
याबाबत मारहाण झालेल्या महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपींच्या विरोधात यापूर्वी पोलिसात तक्रार दिली होती. त्या कारणावरून आरोपींनी महिलेला लोखंडी चिमट्याने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या एकालाही मारहाण करण्यात आली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
गांजा बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्याच्याकडून गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई नेहरू नगर येथील एच ए मैदानावर करण्यात आली.
सूरज दिलीप मिश्रा (२४, संत तुकारामनगर, पिंपरी), अन्सुर सोनारदी शेख (३२, नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई चंद्रकांत जाधव यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीररित्या १५० रुपये किमतीचा ३ ग्रॅम गांजा आणि २० रुपये किमतीची गांजा ओढण्याची सामग्री जवळ बाळगली होती. पोलिसांनी त्यांना चिलीममध्ये गांजा भरून त्याचे सेवन करताना पकडले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.