पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाली आहे. दापोडी मधील पवारवस्ती येथे तिघांनी मिळून दोन रिक्षा आणि सहा दुचाकी अशा आठ वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (१५ फेब्रुवारी) रात्री दहा वाजता घडली.

याप्रकरणी फिरोज इर्शाद शेख (वय ५७, रा. दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नुमान अख्तर खान (वय २३), सिपटेन कय्युम खान (वय १९), मुजफ्फर सलीम कुरेशी (वय १९, तिघे रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे रिक्षा चालक आहेत. शनिवारी रात्री त्यांनी त्यांची रिक्षा पवारवस्ती येथे घराजवळ उभी केली. रात्रीच्या वेळी आरोपींनी शेख यांच्या रिक्षाची तोडफोड केली. त्यानंतर रवीकुमार वेणू गोपाल यांच्याही रिक्षाची आणि परिसरातील पाच ते सहा दुचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड करून नुकसान केले. आरोपींनी कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

शहरातील वाहनतोडफोडीच्या घटना

२५ डिसेंबर २०२४ – निगडी ओटास्कीमध्ये वाहनांची तोडफोड

३० डिसेंबर २०२४ – मोशीत तोडफोड, कोयता हवेत फिरविणे

३१ डिसेंबर २०२४ – भोसरीतील बालाजीनगरमध्ये तोडफोड

१ जानेवारी २०२५ – आळंदी, भोसरीत वाहनांची तोडफोड

४ फेब्रुवारी २०२५ – आळंदी फाटा येथे वाहनांची तोडफोड

९ फेब्रुवारी २०२५ – चिखलीत वाहनांची तोडफोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ फेब्रुवारी – २०२५- दापोडीत वाहनांची तोडफोड