पिंपरी : चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणाला धमकी देऊन, त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. तसेच त्याच्या दोन मित्रांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना चिखलीत घडली. या प्रकरणी केशव मोती विश्वकर्मा (२५, रहाटणी), वकील मस्जिद खान (२०, चिंचवड) या दोघांना अटक केली आहे. एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य कैलास बालटकर (२३, घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य आणि त्यांचा मित्र चकना विकत असताना महिला आरोपी तेथे आली. ‘तू यहा स्नॅक्स सेंटर कैसा चलाता है मै देखती’ असे म्हणत चकना सेंटर बंद करण्याची धमकी दिली. आरोपी केशव आणि वकील यांनी आदित्य यांना दगडाने मारहाण केली. तर, महिला आरोपीने चाकूने वार केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांना मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी केशव आणि वकील या दोघांना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
लिफ्टच्या डक्टमधून पडून मजुराचा मृत्यू
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लिफ्टच्या (उद्वाहक) डक्टवर सुरक्षिततेसाठी कोणतीही जाळी न लावल्याने आणि कामगारास सुरक्षा बेल्ट न पुरवल्याने काम करताना खाली पडून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी द स्कायलार्क सोसायटी, किवळे येथे घडली.
मोहम्मद जैद अब्दुल कलाम खान (२०) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. कयामुद्दीन अब्दुल कलाम खान (२८, शिरगाव, मावळ) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार असगर अली खान (३६, शिरगाव, मावळ) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ मोहम्मद हा किवळे येथे चौथ्या मजल्यावर काम करत असताना, तेथून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी लिफ्टच्या डक्टमध्ये कोणतीही सुरक्षेची जाळी लावलेली नव्हती. तसेच कोणताही सुरक्षा बेल्ट पुरवण्यात आला नव्हता. अशा असुरक्षित ठिकाणी काम करण्यास केल्यामुळे फिर्यादीचा भाऊ मयत झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.
रिक्षा भाड्याच्या जुन्या वादातून तरुणाला मारहाण
रिक्षा भाड्याच्या कारणावरून दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून एका तरुणास शिवीगाळ करून हाताने मारहाण करत सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारून जखमी केले. ही घटना भाटनगर, पिंपरी येथेघडली. याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरातील साहित्य आणण्यासाठी बाहेर जात होते. त्यावेळी त्यांना आरोपींनी अडवले. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात दोन वर्षांपूर्वी रिक्षाच्या भाड्यावरून वाद झाला होता. त्या वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघात, पादचाऱ्याला गंभीर दुखापत
पुणे-नाशिक महामार्गाकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणाने वेगाने वाहन चालवत येऊन पादचारी व्यक्तीला समोरून धडक दिली. हा अपघात तापकीर चौक जवळ, मोशी येथे घडली. या प्रकरणी ५२ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने चालवली. मोटारीने एका पादचारी व्यक्तीला धडक देऊन गंभीर जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.