पुणे : आर्थिक वादातून प्रियकराचा खून करणाऱ्या महिलेला जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सविता प्रकाश जाधव (वय ३०, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. प्रवीण भाग्यवंत (वय ३०, रा. टाकळे चाळ, विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याचा ३ सप्टेंबर २०१८ रोजी खून झाला होता. याबाबत त्याची पत्नी सुनीता (वय २५) हिने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

प्रवीण आणि सुनीता यांच्यात प्रेमसंबंध होते. प्रवीणने सविताला घर बांधून दिले होते. सविताचा विवाह झाला होता. पतीशी पटत नसल्याने ती दोन मुलांसह वेगळी राहत होती. प्रवीण आणि सुनीता यांच्या पैशांवरून सतत वाद व्हायचे. त्यावेळी सविता आईकडे राहण्यास गेली. तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे प्रवीण सविताच्या आईच्या घरी तिला भेटायला गेला होता. तिथे सविताने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. याप्रकरणाचा तपास पिंपरी पोलिसांनी केला होता. सविताविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून अकरा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. या खटल्यात प्रवीणची पत्नी सुनीता हिची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपी सविताला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची तरतूद न्यायालयाने निकालपत्रात केली आहे.