पिंपरी : शहरातील विनापरवाना सुरू असलेल्या खोदकामाची पोलिसांनी पाहणी सुरू केली आहे. वाहतूक विभागाच्या परवानगीविना रस्ते खोदणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विनापरावाना खोदाई करणाऱ्या निगडीतील एका कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्र तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही माहिती व तंत्रज्ञाननगरीचे क्षेत्र आहे. देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे शहरात सातत्याने अती महत्त्वाच्या व्यक्तींसह देश विदेशातील नागरिकांचा राबता असतो. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या तसेच चालू करण्यात येणाऱ्या खोदकामास पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. ठेकेदारांना हे खोदकाम करण्याच्या अगोदर वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्यांना वाहतूक विभागाकडून योग्य त्या अटी व शर्ती घालून ना-हरकतपत्र देण्यात येत असते. हेही वाचा - मावळमध्ये महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना शहरातील काही ठेकेदार वाहतूक विभागाची परवानगी न घेता काम करत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले आहे. अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौरा मार्गावर असे अनधिकृत खोदकाम केल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा विना परवाना खोदकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा - मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट देहूरोड वाहतूक विभागात मुकाई चौक ते किवळे गाव जाणाऱ्या रस्त्यावर लिपारू इन्फ्रा लि. या कंपनीने विनापरावाना खोदकाम काम केले आहे. कंपनीचे फारूक खान (रा. साईनाथ नगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर वाहनांना अडथळा होइल अशा प्रकारे खोदकाम केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.