पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज (मंगळवारी) केंद्रीय मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ड्रोन लाईट शो, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट यासह अन्य कार्यक्रमांचा समावेश होता. मात्र, आज होणारे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस असतो. याचे औचित्य साधून आज (१६ सप्टेंबरला) पुण्यातील टिळक रस्त्यावरील प्रसिद्ध असलेल्या स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांसाठी ड्रोन लाईट शो, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन सुरू आहे.
पुण्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या ड्रोन लाईट शो मध्ये एक हजार ड्रोन चा वापर केला जाणार आहे. अयोध्या, वाराणसी येथे यापूर्वी ड्रोन लाईट शो झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात आणि ते देखील पुणे शहरात या ड्रोन लाईट शो घेण्याचे नियोजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले होते.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. आज देखील हवामान खात्याने पुण्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा लाईट ड्रोन शो आणि इतर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ड्रोन लाईट शो, गायक अवधूत गुप्ते यांच्या कार्यक्रमासह आज होणारे अन्य कार्यक्रम पावसाच्या शक्यतेने पुढे ढकलण्यात आले आहेत. हे कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे उद्या (१७ सप्टेंबरला) होणार आहेत. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत तर ड्रोन लाईट शो हा रात्री आठ ते नऊ या वेळेत होत आहे.
अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा प्रथमच भव्य-दिव्य ड्रोन शो होणार असून यात एकाच वेळी एक हजार ड्रोनच्या माध्यमातून पुणेकरांना तंत्रज्ञानाची नवी अनुभूती मिळणार आहे. यात महाराष्ट्राच्या मानबिंदूंसह पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिबिंब अनुभवयास मिळणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले.