पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसही उतरणार आहे. महापौरपदाच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उतरवणार असल्याची माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा उद्या, बुधवारी होण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाला असल्याने भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याचे नावही उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे महापालिकेच्या महापौरपदासह सर्व पदांसाठी उद्या, ८ तारखेला विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी महापालिकेत खासदार वंदना चव्हाण यांनी मावळते महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक चेतन तुपे, दत्तात्रय धनकवडे, नंदा लोणकर या नगरसेवकांसमवेत महापौर आणि गटनेतेपदाबाबत जवळपास एक तास चर्चा केली. विरोधी पक्षनेत्यासाठी तब्बल १३ जण इच्छुक होते. पक्ष कोणाला संधी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महापौर निवडणूक आणि गटनेता निवडीबाबत आज कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नसून उद्या दुपारपर्यंत महापौरपदाचा आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कमी असले तरी, लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याने आम्ही या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार आहोत, अशी भूमिका वंदना चव्हाण यांनी मांडली.
गटनेतेपदी अरविंद शिंदे यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला उपमहापौरपदाचा उमेदवार द्यावा, असे सांगितले. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून उमेदवार देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली. काँग्रेसच्या गटनेतेपदी अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदाच्या निवडणुकीत भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिल्याने त्यांचा महापौर आणि उपमहापौर होणार आहे. राष्ट्रवादीचा उमेदवारही महापौरपदाची निवडणूक लढणार आहे. उपमहापौरपदासाठी प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असेही बागवे यांनी सांगितले. या दोन्ही पक्षांचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे महापौर आणि उपमहापौरपदावर उमेदवार सहजपणे निवडले जाणार असून त्याचा विचार करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून फक्त अस्तित्वाची लढाई असणार आहे, असे बोलले जाते.