पुणे : समाज माध्यमातूून दहशत माजविणारी चित्रफीत (रील) प्रसारित केल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पाेलीस शिपाई प्रशांत साखरे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, कोथरूड), तसेच समाज माध्यमातील घायवळ खाते चालविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमातून दहशत माजविणारी चित्रफीत प्रसारित करणे, तसेच गुन्हेगारी टोळीचे उद्दात्तीकरण केल्या प्रकरणी घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक अंगद नेमाणे तपास करत आहेत.
घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला घायवळ हा युरोपात असल्याची मााहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे.
घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणी घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले. त्याने ‘ घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात आली आहे.
घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. त्याचे घर आणि कार्यालयाची झडती कोथरूड पोलिसांनी नुकतीच घेतली होती. घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.