पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतिम प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक २४ दत्तनगर, पद्मजी पेपर मिल, गणेशनगरमधून म्हातोबा वस्ती झोपडपट्टी राजकीय सुडापोटी वगळल्याचा आरोप करत प्रभाग रचनेविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी शहरप्रमुख, माजी नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना साेमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम रचनेत प्रभाग क्रमांक २४ दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, गणेशनगर मधील म्हाताेबा वस्ती झाेपडपट्टी परिसर प्रभाग क्रमांक २५ पुनावळे, ताथवडेला जाेडण्यात आला आहे. म्हातोबा वस्ती वगळल्याने अनुसूचित जाती (एससी) चे आरक्षण पडण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक भोसले यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
ॲड. भोसले म्हणाले, ‘हा बदल राजकीय सुडापोटी जाणीवपूर्वक केला आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव प्रभागाचा मूळ हेतू डावलला गेला. प्रभाग क्रमांक २४ मध्ये वाकडमधील म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश होता. येथे अनुसूचित जातीचे आरक्षण पडू नये, यासाठी म्हातोबा झोपडपट्टीचा परिसर प्रभाग क्रमांक २५ मध्ये समाविष्ट केला आहे.
या बदलामुळे प्रभागातील समाजाच्या प्रतिनिधित्ववर परिणाम होण्याची शक्यता आहे. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे प्रभाग क्रमांक २४ मधील संबंधित आकडेवारीचा तपशील सादर करून अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा हेतू अबाधित राहण्यासाठी मागणी करण्यात आली आहे’.
प्रारूप प्रभाग रचना २०१७ प्रमाणे कायम ठेवली होती. अंतिम प्रभाग रचना करताना राजकीय आकसातून बदल करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचे माजी नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले.
महापालिकेला अद्याप कोणतीही नोटीस आली नाही. नोटीस मिळाल्यानंतर कायदा विभागामार्फत उचित कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.