पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, हा खर्च पक्षाच्या नावे लावण्यात आला असल्याने उमेदवारांचा प्रचार खर्च तुलनेने कमी दाखविण्याची क्लृप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक प्रचारासाठी एका उमेदवाराला ४० लाखांची मर्यादा असली, तरी प्रत्यक्षात भाजप, काँग्रेस उमेदवारांचा खर्च दहा लाखांवरही गेलेला नाही.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली जाते. त्याचा खर्च पक्षाच्या खात्यात दाखविला जातो. प्रचारसभा, फेरी, कोपरासभा, जेवण, मांडव यासाठी उमेदवारांना पूर्व परवानगी घ्यावी लागते. याचा दैनंदिन खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केला जातो. आतापर्यंत पोटनिवडणुकीसाठी १५ आणि २० फेब्रुवारी अशी दोनवेळा उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली असून तिसरी आणि अंतिम तपासणी बाकी आहे. त्यानुसार भाजपचे रासने यांनी आतापर्यंत खर्च पाच लाख ९९ हजार १४५ रुपये केला आहे.

हेही वाचा >>> मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली

रासने यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यात तळ ठोकला आहे. याचा खर्च सादर होत असला तरी हे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे हा खर्च रासने यांच्या खर्चात दाखविण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. निवडणूक काळात फडणवीस दहा वेळा प्रचारासाठी पुण्यात आले. मात्र, गुरुवारची (२३ फेब्रुवारी) पदयात्रा वगळता एकही प्रचारसभा घेतलेली नाही. त्यामुळे त्यासाठी परवानगी घेण्याची गरज भासलेली नाही. पदयात्रेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती. त्यामुळे केवळ पदयात्रेचा खर्च रासने यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

हेही वाचा >>> चिंचवडमध्ये १६८, कसब्यात ३८ सैनिक मतदार

दरम्यान, काँग्रेसचे धंगेकर यांनी २० फेब्रुवारीपर्यंत केवळ तीन लाख ९६ हजार ३५५ रुपये खर्च केला आहे. धंगेकर यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सुनील केदार आदी वरिष्ठ नेते पुण्यात आले होते. मात्र, त्याचा खर्च धंगेकर यांच्या खात्यावर नोंदविलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्याचा खर्च समाविष्ट नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आले होते. शहा यांनी कसबा मतदारसंघात जाहीर सभा किंवा कार्यक्रम घेतला नाही. शहा यांनी कसब्यातील ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन तसेच रासने व खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. मात्र, जाहीर सभेत किंवा जाहीर प्रचार केला नसल्याने हा खर्चही गृहीत धरण्यात आलेला नाही.