कुक्कटपालन व्यवसायापुढे आणखी एक संकट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्यात बर्ड फ्लूची साथ नसताना आणि केवळ सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असताना या साथीची धास्ती निर्माण झाली असून कुक्कटपालन व्यवसायापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे.

आठवडय़ापूर्वी केरळमध्ये बर्ड फ्लूची साथ आढळल्याने घबराट निर्माण झाली. हरियाणात बर्ड फ्लूमुळे कोंबडय़ांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिकन, अंडी विक्री व्यवसाय सावरत असतानाच आता केरळमधील बर्ड फ्लूच्या धास्तीमुळे चिकन, अंडय़ांच्या दरात गेल्या आठवडय़ापासून घट सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यावसयिकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. चिकन, अंडय़ांचे सेवन केल्याने करोनाचा संसर्ग होतो, अशी अफवा गेल्या वर्षी मार्च महिन्यात समाजमाध्यमातून पसरविण्यात आल्यानंतर चिकन, अंडय़ांच्या मागणीत कमालीची घट झाली होती. एवढेच नव्हे तर किरकोळ बाजारात १८० ते २०० रुपये किलो असणाऱ्या चिकनचा दर ५० रुपये किलोपर्यंत खाली आला  होता. त्यानंतर कुक्कुटपालन व्यावसायिक शेतकऱ्यांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे.

बर्ड फ्लूच्या भीतीमुळे किरकोळ ग्राहकांकडून चिकन आणि अंडय़ांच्या मागणीत घट झाली आहे. चिकनच्या दरात किलोमागे १० ते २० रुपयांनी घट झाली आहे, तसेच गावरान आणि इंग्लिश अंडय़ांच्या दरातही शेकडय़ामागे घट झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यावसायिक, किरकोळ बाजारातील विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. कुक्कटपालन व्यवसाय जोडधंदा म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. त्या वेळी अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसायाला मोठी झळ बसली होती. तेव्हा केंद्रशासनाला, चिकनच्या सेवनामुळे करोनाचा संसर्ग होत नाही. ही अफवा आहे, असे जाहीर करावे लागले होते.

करोनाच्या संसर्गात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अंडय़ांचे सेवन करावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंडी, चिकनच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना चिकन, अंडय़ांच्या मागणीत वीस टक्के घट झाली आहे, असे शीतल अ‍ॅग्रो ट्रेडर्सचे रूपेश परदेशी यांनी सांगितले.

गेल्या आठवडय़ात चिकनची प्रतिकिलो १९० ते २०० रुपये या दराने विक्री सुरू होती. सध्या चिकनचा किलोचा दर १७० ते १८० रुपये आहे. गावरान, इंग्लिश अंडय़ांच्या दरात मागणीअभावी घट झाली आहे. सध्या घाऊक बाजारात गावरान अंडय़ांचा दर ८५० रुपये शेकडा आहे,  तर  इंग्लिश अंडय़ांचा शेकडय़ाचा दर  ५१० रुपये असा आहे.

बर्ड फ्लूची साथ केरळमध्ये आहे. सध्या कुक्कुटपालन व्यावसायिक शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. ही साथ फार काळ राहणार नाही तसेच कुक्कुटपालन व्यवसायावर फार मोठा परिणाम होणार नाही. आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल.

– डॉ. प्रसन्न पेडगावकर, महाव्यवस्थापक, वेंकटेश्वरा हॅचरिज लिमिटेड

महाराष्ट्रात बर्ड फ्लूची साथ आढळून आलेली नाही. पुणे जिल्ह्य़ातून चिकन, अंडय़ांची आवक शहरात होत आहे. तुटवडा निर्माण झाल्यास हैदराबाद आणि कर्नाटकातून अंडी मागविण्यात येतात.

– रूपेश परदेशी, शीतल अ‍ॅग्रो ट्रेडर्स

परभणीत शेकडो कोंबडय़ा, पक्ष्यांचा मृत्यू

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे शेकडो कोंबडय़ा शुक्रवारी मृतावस्थेत आढळून आल्या. शहरातील नारायण चाळ परिसरातही दिवसभरात अज्ञात आजाराने काही पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेची पशुचिकित्सक विभागाकडून नोंद घेण्यात आली असून औरंगाबाद येथून एक पथक लवकरच दाखल होऊन पाहणी करणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरुंबा येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या ने-आण करण्याबाबत शुक्रवारपासून प्रतिबंध घातला आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाचे पथक मुरुंबा येथे लगेच दाखल झाले असून मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचे नमुने त्यांनी तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. ‘बर्ड फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर सतर्कतेचा इशाराही संबंधितांकडून देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poultry industry faces new crisis due to bird flu zws
First published on: 10-01-2021 at 03:57 IST