महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रभारी प्रमुख कार्यवाहपदी प्रकाश पायगुडे यांची मंगळवारी निवड करण्यात आली. परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक १९ मे रोजी होणार असून तोपर्यंत पायगुडे हेच काम पाहणार आहेत.
परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये प्रा. मििलद जोशी यांचा राजीनामा ठेवण्यात आला. त्यावर कोणतीही चर्चा न होता तो मंजूर करण्यात आला असून आता औपचारिकता म्हणून कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा राजीनामा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. साहित्य महामंडळाची बैठक २५ मे रोजी होणार असून त्यामध्ये आगामी ८७ वे साहित्य संमेलन आणि लंडन येथील विश्व साहित्य संमेलनासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. प्रकाश पायगुडे यांची निवड प्रभारी असल्यामुळे त्यांना आर्थिक व्यवहारांसंदर्भातील अधिकार असणार नाहीत, असेही माधवी वैद्य यांनी सांगितले.