लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव पार्क भागातील शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, या भागात पोलिसांकडून वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर, कॅन्टोन्मेंट, कसबा या आठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागून करण्यात आले असून, मतमोजणी केंद्रात मोबाइल, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत. मतमोजणी केंद्रात विनापरवानगी (पास) प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणी केंद्रात काडीपेटी, तसेच अन्य ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागात वाहनांना मनाई करण्यात आली असून, जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-अनधिकृत बांधकामप्रकरणी ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोरेगाव पार्क भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक पाच, गल्ली क्रमांक २, गल्ली क्रमांक तीन, गल्ली क्रमांक चार परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉन बॉस्को युवा केंद्रापासून मतमोजणी केंद्रापर्यंतचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला जाईल. सेंट मीरा महाविद्यालय, अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक एकमधून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या भागातील रस्ते वाहतुकीस खुले करुन देण्यात येणार आहेत.