पुणे : राज्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे निदर्शनास आणून देण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी कराव्यात. ही तक्रार संबंधित अभियंत्याकडे जाऊन रस्त्यावरील खड्डे भरणे आदी कामे तातडीने करून पुन्हा संबंधित कामाचे छायाचित्र अपलोड करून तक्रारदार नागरिकांना संदेशाद्वारे कळविण्यात येईल, अशी कल्पना घेऊन मोबाइल ॲप तयार करण्यात आले होते. मात्र, यथावकाश हे ॲप बंद झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा हवेतच विरली आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चव्हाण हे पुणे दौऱ्यावर आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पॉटहोल कंप्लेंट रिद्रेड्रेसल सिस्टीम (पीसीआरएस) हे  ॲप सुरू केले आहे. त्यावर नागरिकांना आपले अभिप्राय, सूचना, तक्रारी देता येतील. नागरिकांच्या तक्रारीची माहिती संबंधित अभियंत्याला जाईल आणि त्यानुसार रस्त्यावरील खड्डे भरणे आदी कामे विहित वेळेत करून दुरुस्तीचे छायाचित्र अपलोड करून संबंधित नागरिकाला संदेशाद्वारे कळविण्यात येईल, अशी ही यंत्रणा आहे.

हेही वाचा…येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी ई-लायब्ररीची सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्याची अंमलबजावणी देखील या विभागाने सुरू केली. या ॲपवर सुरुवातीच्या टप्प्यात १०२० हून अधिक तक्रारी छायाचित्रासह दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजेच ९०० तक्रारी, नाशिक २५, छत्रपती संभाजीनगर दोन, नांदेड १३, अमरावती आणि नागपूर प्रत्येकी ३३ अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सुरूवातीला खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एजन्सी नेमली नव्हती आणि आता तांत्रिक कारण देत हे ॲप बंद असल्याचे समोर आले आहे.