पुणे : ‘देशात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी आणि शौचालयांसाठी अनुदान देण्यात येत असल्याने अनेक आजार कमी झाले आहेत. मात्र, अन्य आजारांसाठी, ८० कोटी नागरिकांकरिता ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा विनामूल्य उपचार विमा लागू करण्यात आला आहे,’ अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
‘पूना लाइफस्पेस इंटरनॅशनल’ या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वडाची वाडी येथे शुक्रवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे विश्वस्त देविचंद के. जैन, राजकुमार चोरडिया, पुरुषोत्तम लोहिया या वेळी उपस्थित होते.
‘देशात ‘एमबीबीएस’ डॉक्टरांच्या प्रतिवर्षी ५१ हजार जागा होत्या, त्या दुप्पट होऊन १ लाख १८ हजार झाल्या आहेत. देशाचे आरोग्याचे अंदाजपत्रक ३७ हजार कोटी रुपयांवरून १ लाख ३६ हजार कोटी करण्यात आले आहे,’ असे शहा यांनी सांगितले. ‘पूना लाइफस्पेस इंटरनॅशनल’चे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय १४ एकर क्षेत्रावर उभारले जाणार आहे. त्यासाठी नऊशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पूना हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम लोहिया यांनी आभार मानले.