पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने मुंबई-पुणे रस्त्यावीरल वाकडेवाडी आणि हडपसर परिसरात कारवाई करून सात लाख ८८ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत आरोपींकडून अफुच्या बोंडाचा चुरा, तसेच गांजा असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.
हडपसर भागातील मांजरी परिसरात अफुच्या बोंडांचा चुरा विक्रीसाठी आलेल्या राजस्थानमधील दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख १५ हजार ५०० रुपयांचा तीन किलो अफुच्या बोंडाचा चुरा जप्त करण्यात आला. राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१), ताराचंद सीताराम जहाँगीर (वय २६, दोघे रा. खेडकर मळा, पांगारे वस्ती, ऊरळी कांचन, मूळ रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मांजरी रस्त्यावर अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. रामावत आणि जहाँगीर यांच्याकडून पोत्यात भरलेला अफुचा बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला.
मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच लाख ७२ हजार रुपयांचा २१ किलो गांजा जप्त करण्यात आला. भागवत शिवाजी मंडलिक (वय २६, रा. विमल गार्डनजवळ, रहाटणी,), मुसीम सलीम शेख (वय २६) , महेेश नारायण कळसे (वय २४, दोघे रा. शिरुर कासार, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, संदीप जाधव, उदय राक्षे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, रवींद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्कर, तसेच विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आठवडभरात पोलिसांनी बिबवेवाडी, कोंढवा, बुधवार पेठ परिसरात कारवाई करुन मेफेड्रोन, गांजा असे अमली पदार्थ जप्त केले.