पुणे : सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाच्या कामामुळे बंद करण्यात आलेला शिवाजीनगर न्यायालयातील भुयारी पादचारी मार्ग चार वर्षांनंतर गुरुवारी खुला करण्यात आला. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या वकील आणि पक्षकारांची गैरसोय संपली आहे.
मेट्रोचे काम पूर्ण होऊनही मार्ग बंद असल्याने न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांसह पक्षकारांची गैरसोय होत होती. याबाबत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड यांनी भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणी महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली होती. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे यांच्या हस्ते या भुयारी पादचारी मार्गाचे उद्घाटन करून गुरुवारी तो खुला करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर कौटुंबिक न्यायालयासाठी नवीन इमारत उभारताना जिल्हा न्यायालय व कौटुंबिक न्यायालयाला जोडण्यासाठी हा भुयारी मार्ग तयार करण्यात आला. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दीड कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी दिली होती. महापालिकेने अर्थसंकल्पात भुयारी मार्गांसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करून या संदर्भातील ठराव मंजूर केला होता.
कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या पाच महिन्यांनंतर तो सुरू करण्यात आला. काही महिने भुयारी मार्ग सुरू राहिल्यानंतर शिवाजीनगर धान्य गोदामाच्या ठिकाणी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाल्यामुळे हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतरही मेट्रो भुयारी पादचारी मार्ग बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य ॲड. गणेश माने आणि ॲड. पूनम मावाणी यांनी दिली.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड म्हणाले, ‘भुयारी पादचारी मार्गाबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे पुणे बार असोसिएशनच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. भुयारी मार्ग सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याचे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
न्यायालय, तसेच महापालिका प्रशासनाच्या सहकार्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या वकिलांसह पक्षकार, कर्मचारी यांना एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात जाणे सोयीस्कर होणार आहे.’
‘भुयारी पादचारी मार्ग सुरू झाल्याने वकील, कर्मचारी, तसेच पक्षकारांची गैरसोय थांबणार आहे. भुयारी मार्ग बंद असल्याने सर्वांना रस्त्याने ये-जा करावी लागत होती. परिणामी, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसह रसत्यावरील वर्दळीमुळे सातत्याने वाहनकोंडीला सामोरे जावे लागत होते,’ असे ॲड. प्रथमेश भोईटे यांनी सांगितले.