शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष प्रवेशोत्सवाने सुरू झाले. पदवी अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया येत्या काही काळात पूर्ण होईल. तर, व्यावसायिक अभ्यासक्रमांचीही प्रवेशप्रक्रिया आता सुरू होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्येही आता विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. या नव्या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयांनी वेगवेगळ्या उपक्रमांची तयारी केली आहे. काही स्वायत्त महाविद्यालये, विद्यापीठांनी नवे अभ्यासक्रम जाहीर केले आहेत.
‘विदा पत्रकारिता’ अभ्यासक्रम
येत्या काळात विदा विज्ञानाच्या क्षेत्राचे वाढणारे महत्त्व, माध्यम क्षेत्रातील नव्या संधींचा विचार करून फर्ग्युसन महाविद्यालयाने विदा पत्रकारिता या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम तयार केला आहे. विदा विज्ञानाच्या क्षेत्रातील कौशल्य, माध्यम क्षेत्रांत आवश्यक असलेली राजकीय, सामाजिक समज अशा दोन्ही घटकांवर या अभ्यासक्रमामध्ये भर दिला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी विदा आणि माध्यमे या दोन्ही क्षेत्रांत रोजगारक्षम असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रचना करण्यात आलेल्या या एक वर्ष मुदतीच्या अभ्यासक्रमास एकूण ४० श्रेयांक आहेत. अनुभवाधारित शिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पुढील संधींसाठी साहाय्य ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. अधिक माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. श्याम मुडे आणि अभ्यासक्रमाचे संयोजक, तसेच माध्यम व संज्ञापन विभागाचे प्रमुख योगेश परळे यांनी दिली.
ब्युटी, वेलनेस अभ्यासक्रम
आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रांतर्गत यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल्स संस्थेतर्फे फेमिना फ्लॉण्ट ॲकॅडमीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲकॅडमीअंतर्गत ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील अद्ययावत अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. हे अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमावेळी राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, सिडेस्को इंटरनॅशनलच्या सल्लागार सीमा गोपुजकर या वेळी उपस्थित होते.
व्यसनाधीनतेविरोधात अभियान
सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सिम्बायोसिस सेंटर फॉर इमोशनल वेलबीईंगतर्फे २६ जून रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करीविरोधी दिनानिमित्त वर्षभराचे अभियान जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम, तज्ज्ञांच्या कार्यशाळा, जागरूकता मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर यांनी दिली. सिम्बायोसिस सेंटर फॉर इमोशनल वेलबीईंगच्या प्रमुख डॉ. गिरिजा महाले, सिम्बायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सेसच्या संचालिका डॉ. नयना निमकर, सिम्बायोसिस कम्युनिटी आउटरीचच्या प्रमुख डॉ. रेश्मा पाटील, प्रा. ललित डॅनियल या वेळी उपस्थित होते. व्यसनाधीनतेमध्ये अमली पदार्थांपासून मोबाइलपर्यंतचा समावेश आहे. या सर्व प्रकारच्या व्यसनाधीनतेमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर, कुटुंबावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबतची जागृती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयानंतर एकूणच जग आता बदलाच्या उंबरठ्यावर आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्षात पारंपरिक अध्ययन-अध्यापनासह नवे अभ्यासक्रम, नवे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. त्यातून शिक्षण क्षेत्राला नावीन्यता, विद्यार्थ्यांना भविष्यासाठीची दिशा मिळणार आहे.
chinmay.patankar@expressindia.com