पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे खडकवाला धरणासह पानशेत आणि वरसगाव धरणातून विसर्गाला सुरूवात झाली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सोमवारी सकाळी १४ हजार ५४७ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. त्याचबरोबर पानशेत आणि वरसगाव धरणातूनही नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.

पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या येव्यानुसार विसर्ग आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. शहरासह खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर संततधार कायम राहिली. पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली.

खडकवासला धरणातून सोमवारी सकाळी नऊ वाजता १० हजार ६११ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामध्ये तासाभरातच वाढ करून विसर्ग १४ हजार ५४७ क्युसेक करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणामधून नदी पात्रामध्ये सांडव्याद्वारे २ हजार २४० क्युसेक तर विद्युत निर्मिती केंद्रातून ६०० असा एकूण २ हजार ८४० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ३ हजार ९९६ क्युसेक विसर्ग वाढवून सांडव्याद्वारे ५ हजार ९०८ क्युसेक आणि विद्युत निर्मिती केंद्रद्वारे ६०० क्युसेक असा एकूण ६ हजार ५०८ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

वरसगाव धरणाच्या सांडव्यातून २ हजार ९७६ क्युसेक आणि विद्युत निर्मिती केंद्रातून ६०० असा एकूण ३ हजार ५७६ क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आल्याने मुठा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठची शेती अवजारे आणि तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.