पुणे : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, नऊ शाळांकडे इरादा पत्र आहे; पण अंतिम मान्यता नाही. तर, शासन मान्यता असलेल्या २४ शाळा मूळ जागेवर सुरू नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढला आहे. मात्र, शाळा अनधिकृत आहे का, याची माहिती नसल्याने पालकांची फसवणूक होते. त्यामुळे अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी अनधिकृत शाळांबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या अहवालानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १३ शाळा अनधिकृत आहेत. नऊ शाळांना इरादापत्र प्राप्त झाले आहे, पण शासन मान्यता मिळालेली नाही. तर २४ शाळांना शासन मान्यता मिळाली असताना त्या मूळ जागेवर भरत नाहीत.
दौंड, हवेली, पुरंदर आणि मावळ तालुक्यातील प्रत्येकी एक, मुळशी तालुक्यातील सात, खेड तालुक्यातील तीन, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एक, तर पुणे महापालिका क्षेत्रातील नऊ शाळा मूळ ठिकाणी भरत नसल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
काही शाळा त्यांना शासनाची मान्यता नसताना प्रवेशाची जाहिरात करतात. मात्र, शासनाची मान्यता नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण भागातील गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन संबंधित शाळा बंद कराव्यात. तसेच, शाळेच्या बाहेर फलक लावावा. अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास त्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची राहील, असेही नाईकडे यांनी स्पष्ट केले.