पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमधून सहभागी होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. त्या दरम्यान शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मिळालेल यश पाहून अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. तर मागील वर्षभराच्या कालावधीत शरद पवार यांनी राज्यभरात दौरे करून अनेक आजी माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आहे. त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवार यांना उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देखील मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने शरद पवार यांच्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान आज पुण्यातील हडपसर भागातील वानवडी येथे सातारा जिल्हा मित्र मंडळ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्नेह मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमास अजित पवार यांचे विश्वासू सहकारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी हजेरी लावल्याने अनेक चर्चांना उधाण आले. हेही वाचा - पुणे: तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; ४ पिस्तुल अन् १२ जिवंत काडतुसे जप्त हेही वाचा - पिंपरी: नवजात बालक जिवंत असताना डॉक्टरांनी बनवला स्मशान दाखला; Ycm मधील धक्कादायक घटना कार्यक्रमानंतर आमदार चेतन तुपे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सातारा जिल्हा मित्र मंडळ यांच्या वतीने वानवडी येथे कार्यक्रम घेण्यात आला आहे. मला त्यांच्याकडून निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार मी कार्यक्रमाला आलो होतो. माझ्यासह कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम राजकीय नव्हता, तर अराजकीय कार्यक्रम होता, अशी भूमिका यावर त्यांनी मांडली.