पुणे : शहरातील गतिरोधक अशास्त्रीय असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्यानंतर किती गतिरोधक मानांकनाप्रमाणे आणि शास्त्रीय पद्धतीने आहेत, याची माहिती महापालिकेने गुलदस्तात ठेवली आहे. त्यामुळे शहरातील गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीचे आणि मानांकनाप्रमाणे नसल्याच्या आरोपांनाही पुष्टी मिळत आहे.
महापालिकेच्या पथ विभागातील कनिष्ठ आणि वरिष्ठ अभियंत्यांनी पायी फिरत शहरातील गतिरोधकांचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर या संदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकार दिनामध्ये शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक किती आहेत, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी त्यांनाही ही माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला त्याबाबतची माहिती देता आलेली नाही. त्यामुळे नक्की सर्वेक्षण कशाचे झाले, असा प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा >>>निवडुंगापासून रस, पशुखाद्य, नैसर्गिक चामडे; प्रायोगिक तत्त्वावर पुण्यात प्रकल्प
मानकांप्रमाणे असलेले गतिरोधक दाखवा आणि प्रति गतिरोधक १०० रुपये मिळवा, असे खुले आव्हानही वेलणकर यांनी एक महिन्यापूर्वी महापालिकेला दिले होते. मात्र मानांकनाप्रमाणे असलेल्या गतिरोधकांची माहितीच गुलदस्तात असल्याने त्यांनी केलेल्या आरोपालाही पुष्टी मिळत आहे.
शहरातील किंवा ग्रामीण भागातील रस्ते तयार करताना इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार रस्ते, पदपथ, गतिरोधक तयार करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून महत्त्वाच्या, आवश्यक त्या ठिकाणीच गतिरोधकही तयार केले जातात. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील अंतर्गत भागांत प्रत्येक रस्त्यावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गतिरोधक तयार केले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब सर्वेक्षणावेळी निदर्शनास आली होती. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनीही गतिरोधक धोरण आणि त्याची अंमलबजावणीची पद्धत निश्चित करण्यात आली असून, त्याप्रमाणे सर्व गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.