पुणे : पानशेत येथे फिरायला गेलेल्या तरुणांनी छातीवर दगड मारून स्थानिक तरुणाचा खून करून ते पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलिसांच्या मदतीने कारवाई करून पाच जणांना जेरबंद केले.

रोहिदास काळुराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता. वेल्हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश सुभाष भिसे (वय २१, रा. नऱ्हे), भागवत मुंजाजी आसुरी (वय २०, रा. नऱ्हे), रितेश उत्तम जोगदंड (वय २१) उमेश ऊर्फ भैया रामभाऊ शेळके (वय २१) आणि पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १९) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अविदास काळुराम काटकर (वय २३) यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. शहरातील नऱ्हे भागात ते राहतात. १५ जून रोजी दुचाकीवरून सर्वजण पानशेत धरणाकडे फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी सात वाजता पुण्याकडे परतत असताना ते एका हॉटेलसमोर सिगारेट ओढण्यासाठी थांबले. त्या वेळी रोहिदास काटकर आणि आरोपींमध्ये वाद झाला. आरोपींनी त्याच्या छातीवर दगड मारला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पाचही आरोपी दोन दुचाक्यांवरून पुण्याच्या दिशेने पळून गेले.

‘पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्या वेळी दोन्ही वाहने तिथून जाताना पोलिसांना आढळली. ही वाहने नऱ्हे गावाच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. तसेच एका वाहनाच्या नंबरप्लेटवरील केवळ अंक दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी नऱ्हे परिसरात संबंधित वाहनांचा शोध घेतला’, असे गिल यांनी सांगितले.

सबंधित दुचाकी नऱ्हे येथील वाल्हेकर चौकातील एका कापड दुकानासमोर आढळली. पोलिसांनी माहिती मिळवून दुचाकीमालकाशी संपर्क साधून गुन्ह्याबाबत चौकशी केली. त्या वेळी दुचाकीमालकाने त्याची मोपेड मित्र आकाश भिसे याला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी भिसेला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सोबतच्या सहकाऱ्यांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनादेखील ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक अमित देशमुख पुढील तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, वेल्हा पोलीस प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक नितीन खामगळ, सहायक निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, हनुमंत पासलकर, अतुल डेरे, अमोल शेडगे, रामदास बाबर, राहुल घुबे, प्रसन्न घाडगे, वेल्हा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित देशमुख, अंमलदार ज्ञानदीप धिवार, पंकज मोघे, आकाश पाटील, राजेंद्र आवदे, अजय गार्डी, सोमनाथ जाधव, युवराज सोमवंशी यांनी ही कारवाई केली.