पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रवासी सेवेची भाडेवाढ आज, रविवारपासून (१ जून) लागू होत आहे. नवीन दररचनेनुसार, १ ते ५ किमी अंतरासाठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत, तर पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीत दैनंदिन पास ४० ऐवजी ७० रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत १२० ऐवजी १५० रुपयांना, तर मासिक पास ९०० ऐवजी दीड हजार रुपयांना झाल्यामुळे आजपासून ‘पीएमपी’ प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पीएमपीच्या एक हजार ६०० बस धावतात. पीएमपीची गेल्या ११ वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आली नव्हती. राज्य परिवहन मंडळ, बेस्ट, तसेच नागपूर शहर बससेवा यांनी केलेल्या तिकीट दरवाढीच्या आधारावर पीएमपीने नव्याने दरवाढीचा प्रस्ताव करून संचालक मंडळाची मान्यता घेतली. त्यानुसार, एक जूनपासून पहिल्या दोन किलोमीटर अंतरासाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी दोन किलोमीटरसाठी पाच रुपये भाडे आकारले जात होते.

एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी पाच किलोमीटरच्या अंतराने विविध टप्पे, तर त्यापुढील ३० ते ८० किलोमीटर अंतरासाठी दहा किलोमीटरच्या अंतराने पाच टप्पे अशा एकूण ११ टप्प्यांमध्ये नवीन तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत.

अशी आहे भाडेवाढ

पहिला टप्पा : ५ किलोमीटरपर्यंत – १० रुपये
दुसरा टप्पा : ५.१ ते १० किमी – २० रुपये
तिसरा टप्पा : १०.१ ते १५ किमी – ३० रुपये
चौथा टप्पा : १५.१ ते २० किमी – ४० रुपये

यंत्रणेतील बदल पूर्ण

भाडेवाढ केल्यानंतर प्रशासनाने ‘ई तिकीट’ प्रणाली, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, ‘ऑनलाइन ॲप’मध्येही अनुषंगिक बदल केले आहेत. प्रवासी शुल्क आकारताना गोंधळ होऊ नये म्हणून वाहकाकडे स्वतंत्र भाडेपत्रक देण्यात आले आहे. त्यानुसार किलोमीटर आणि थांब्यांची निश्चिती करण्यात आली असून, यंत्रणेत तांत्रिक बदल करण्यात आले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या ११ वर्षांत पेट्रोल, डिझेलचे दर वाढूनही पीएमपीने भाडेवाढ केली नव्हती. ज्याप्रमाणे भाडेवाढ करण्यात आली आहे, त्याप्रमाणे मार्गिका विस्तार, प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधाही वाढविण्यात आल्या आहेत. पीएमपी संचलनादरम्यान येणाऱ्या अडचणींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत – डॉ. दीपा मुधोळ-मुंडे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल