पुणे : दिवाळीत मूळगावी गेलेले नागरिक पुणे, मुंबईकडे परतण्यास शुक्रवारपासून (२४ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. गावाहून परतणाऱ्या नागरिकांच्या मोटारी, खासगी बसमुळे महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस, पुणे पोलीस, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहनचालकांना महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
पुणे, मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकजण वास्तव्यास आहेत. पुण्यात शिक्षणानिमित्त मोठ्या संख्येेने विद्यार्थी वास्तव्यास आहेत. दिवाळी संपल्यानंतर २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान महामार्गावरील वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. परगावाहून, तसेच परराज्यातून अनेकजण पुणे-मुंबईकडे रवाना होणार अहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस दलाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे.
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, तसेच बाह्यवळण मार्गावरील वर्दळ वाढणार आहे. कोल्हापूरहून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असणार आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील चाकण परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग संथ होण्याची शक्यता आहे. सोलापूरहून पुण्याकडे मोठ्या संख्येने वाहने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. मोटारी, खासगी बसने पुण्याकडे येणे टाळावे. महामार्गावरील गर्दी आणि कोंडी विचारात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत प्रवास टाळावा. महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. पोलिसांनी दिलेल्या नियमांचे आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसंकडून करण्यात आले आहे.
पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी सूचना
- शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा
- महामार्गावरील गर्दी विचारात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे
- सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत प्रवास टाळावा
- महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा
- वेगावर नियंत्रण ठेवावे
- वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा.
