पुणे : वडगाव मावळ, तसेच सातारा, रायगड जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणारा गुंड किरण मोहितेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले.
किरण एकनाथ मोहिते (वय २९, रा. व्हिजन वुडस, जांभुळ ता. मावळ), एकनाथ अर्जुन मोहिते (वय ५३ रा. जांभुळ ता. मावळ) रवींद्र लक्ष्मण मोहिते (वय ३३ रा. कुडेवाडा, वडगाव मावळ), मयूर ऊर्फ चण्या बजरंग मोढवे (वय २६, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ ) करण रमेश पवार (वय २५, रा. टाकवे बुदुक, ता. मावळ ) सुशांत अनिल साबळे (वय २४, रा. केशवनगर, वडगाव मावळ) अशी मकोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख किरण मोहिते पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
मोहिते टोळीविरुद्ध वडगाव मावळसह पुणे ग्रामीण, सातारा, रायगड जिल्ह्यामध्ये दहशत माजविली होती. मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, जबरी चोरी करणे, डॉक्टरांवर हल्ला करणे, कट करुन खंडणी मिळवण्यासाठी खुनाचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न करणे असे नऊ गुन्हे दाखल आहेत.
वडगाव मावळ परिसरातील एका हॉटेलमध्ये १० नोव्हेंबर २०२४ रोजी मोहिते आणि साथीदारांनी संतोष रामभाऊ साळुंखे यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत शाहरुख हनिफ अत्तार (वय ३२ रा. चिखली, पिंपरी-चिंचवड) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात ७ आरोपी सामीलअसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. उपनिरीक्षक आर. आर. मोहिते यांनी सात आरोपींविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
मोहितेसह टोळीविरूद्ध ‘मकोका’ करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनखाली तयार करण्यत अला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, जावळे, पासलकर, सागर नामदास, तुषार भोईटे. महेश बनकर, अमोल कसबेकर, किरण नांगरे, गणेश होळकर, सिध्दार्थ वाघमारे यांनी ही कारवाई केली.