पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात परदेशात पसार झालेला गुंड नीलेश घायवळ याचे पारपत्र पारपत्र कार्यालयाने रद्द केले. घायवळ याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जागतिक गुन्हेगारी पोलीस संघटनेशी (इंटरपोल) संपर्क साधला असून, त्याला ब्ल्यू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी घायवळचे याचे पारपत्र रद्द करण्यासाठी पारपत्र कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानंतर पारपत्र कार्यालयाने त्याचे पारपत्र रद्द केले, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. १७ सप्टेंबर रोजी घायवळ टोळीतील गुंडांनी कोथरूड भागातील एका तरुणावर गोळीबार केला होता, तसेच एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत माजविली होती. या प्रकरणात घायवळ टोळीतील गुंडांना अटक केली होती. या प्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन यांच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे.

घायवळचा शोध घेण्यात आला. तेव्हा घायवळने ‘घायवळ’ ऐवजी ‘गयावळ’ या नावाने पारपत्र काढले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढल्यानंतर घायवळ युरोपात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. घायवळचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. घायवळचे पारपत्र रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी पारपत्र कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानंतर पारपत्र कार्यालयाने गुरुवारी त्याचे पारपत्र रद्द केले.

घायवळचा भाऊ सचिन हा ‘मकोका’ कारवाईनंतर पसार झाला असून, त्याचाही ठावठिकाणा लागलेला नाही. सचिन हा शाळेत क्रीडाशिक्षक आहे. घायवळ, त्याचा भाऊ सचिन यांच्यासह साथीदारांविरुद्ध एका महिला व्यावसायिकाला धमकावून ४४ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून दहा सदनिका बळकाविल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घायवळने अहिल्यानगर ग्रामीण पाेलीस दलातील अहमदनगर विभागातून बनावट कागदपत्रे सादर केली. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाने बनावट कागदपत्रे सादर करून २०१९ मध्ये घायवळने पारपत्र मिळवले. अहमदपूर पोलिसांनी पारपत्र पडताळणी (पासपोर्ट व्हेरिफिकेशन) केली होती. या प्रकरणाची पुणे पोलिसांकडून चाैकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत अहमदपूर येथील विशेष शाखेतील पारपत्र विभागात कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत.