पुणे : कामावरुन काढल्याने झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. विमानतळ पोलिसांनी तपास करून लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन वर्षांच्या मुलीची सुखरूप सुटका केली.

प्रिन्स पाल (वय २५), ओमनारायण पाल (वय २४, सध्या रा. शुभ निर्मल, सिंबायोसिस लॉ कॉलेजजवळ, विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मुलीच्या आईने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गृह प्रकल्पांवर मजूर पुरविण्याचे काम ठेकेदार करतो. ठेकेदाराकडे प्रिन्स पाल आणि ओमनारायण पाल हे काम करत होते. दोघे जण व्यवस्थित काम करीत नसल्याने त्यांनी दोघांना कामावरून काढले. त्याचा राग मनात धरून त्यांनी ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण केले. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली, अशी माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा ठेकेदाराकडे काम करणारे चौघे जण बिहारला निघाल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपासात पाल रेल्वेने निघाल्याची माहिती मिळाली. दोघांनी मुलीचे अपहरण केल्याचा संशय मुलीच्या आईने फिर्यादीत व्यक्त केला होता. त्यानंतर दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले. तांत्रिक तपासात दोघे जण इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली.

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात इंद्रायणी एक्सप्रेस पोहोचली. लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पाल याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तीन वर्षांच्या मुलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे पथक कल्याणला पोहोचले. आरोपींना अटक करण्यात आली.

मंगळवारी सकाळी मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.