पुणे : राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार १८६१ व्यवस्थापनातील ८५५६ रिक्त पदांपैकी ८२६४ पदांसाठी १२९६६ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून शिफारस करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांची आता मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये सुमारे ११ हजार पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीविना प्रकारात एकूण १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. आता मुलाखतीसह प्रकारातील पदभरती राबवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, मुलाखतीसह पदभरतीसाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलाखतीसह पदभरतीमध्ये एकवाक्यता आणणे आणि उमेदवारांचे योग्यरीत्या मूल्यमापन होण्यासाठी शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या मानक कार्यपद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते दहावी, इयत्ता अकरावी ते बारावी, अध्यापक विद्यालये या गटातील व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८१ व्यवस्थापनांची १७७ पदे रद्द

विविध प्रशासकीय कारणास्तव ८१ व्यवस्थापनांची एकूण १७७ पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही. संबंधित व्यवस्थापनांतील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.