जेजुरी : पंढरपूरकडे निघालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी पहाटे सहा वाजता खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन वाल्हेगावाकडे प्रस्थान ठेवले.
पालखी सोहळा दौंडज खिंडीमध्ये आल्यावर न्याहारीसाठी विसावला. या वर्षी येथील डोंगरात भरपूर पाऊस झाल्याने डोंगर हिरवाईने नटला आहे. न्याहारीनंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी । पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ।
असे पांडुरंगाचे अभंग, गाणी, पदे म्हणत पालखी सोहळ्याने दुपारी साडेअकरा वाजता महर्षी वाल्मीकऋषींच्या नगरीत प्रवेश केला. या वेळी दत्तात्रय पवार, सचिन लंबाते, अमोल खवले, प्रवीण कुमठेकर, सागर भुजबळ, सचिन देशपांडे, पल्लवी भोसले, पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
गावापासून अडीच किलोमीटर अंतरावरील पालखी तळावर दुपारी साडेबारा वाजता पालखी सोहळा पोहोचला. या ठिकाणी आरती करण्यात आली. या वेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप, बाळासाहेब चोपदार, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, माजी सरपंच अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.
मोबाइल चार्जिंगची सुविधा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांना कुटुंबीयांशी संपर्क करण्यासाठी मोबाइल चार्जिंगची सुविधा ग्रामस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आली.