पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील शनिवारवाड्यामध्ये आठ दिवसांपूर्वी मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, भाजपच्या नेत्या, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी असंख्य हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांसह शनिवारवाड्यामध्ये प्रवेश केला. मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमाज पठण केले होते, त्या जागेवर जाऊन ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून शुद्ध केली. त्यानंतर शिववंदना देखील म्हणण्यात आल्यानंतर, शनिवारवाडा परिसरात असलेली मजार काढून टाकण्यात यावी, अशी मागणी देखील मेधा कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.

त्या आंदोलनानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारवाडा परिसरात आंदोलन केले. या सर्व घडामोडींदरम्यान, आज मुळा-मुठा नदी पात्रालगत असलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील दुरवस्था झालेल्या ठिकाणाची ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि वसंत मोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी स्वच्छता केली. तसेच यावेळी समाधीस्थळी असलेल्या पिंडीला दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला.

यावेळी वसंत मोरे म्हणाले, “जैन समाजाच्या जमीन खरेदी प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आल्यानंतर, त्या विषयावरून लक्ष हटविण्यासाठी शनिवारवाड्यामध्ये झालेल्या नमाज पठणचे प्रकरण समोर आणण्यात आले. ज्या व्यक्तिमत्वाने शनिवारवाडा उभारला, त्या नानासाहेब पेशव्यांच्या समाधी स्थळाची जागा मेधा कुलकर्णी यांना का आठवली नाही? मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजपमधील सर्व नेतेमंडळींनी समाधी स्थळी येऊन पाहणी करावी की, नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळ परिसराची काय अवस्था झाली आहे. या ठिकाणी गवत आणि बाटल्या आढळून आल्या आहेत. पण ते काही झाले की, ‘हिंदुत्व, हिंदुत्व’ म्हणतात… हे तर भाजपचे बेगडी हिंदुत्व आहे,” असे सांगत त्यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली.

ते पुढे म्हणाले, “शनिवारवाड्यामध्ये मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याची घटना घडते, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले. तुमचे तिथे हिंदुत्व जागे होते, तर तुमचे इथे हिंदुत्व झोपले आहे का? भाजपचे हिंदुत्व कुठे गेले?” असा सवाल उपस्थित करीत त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली.

तसेच ते म्हणाले, “तुम्ही तिकडे गोमूत्र शिंपडता, शेणाने जागा सारवता; तर या ठिकाणी तुम्हाला पाणी मारण्यास येता येत नाही का? या ठिकाणी तुमचे हिंदुत्व जागे झाले नाही का?” असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले, “मेधा ताई, या ठिकाणी देखील तुमचे हिंदुत्व जागे करा,” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले, “नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळाची दुरवस्था मोठ्या प्रमाणावर झाली आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या सुविधा द्याव्यात, या ठिकाणी सुरक्षा रक्षक द्यावा, अशी आमची मागणी आहे. येत्या चार दिवसांमध्ये आमच्या मागणीची पूर्तता न झाल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात येथील सर्व कचरा फेकून देऊन आंदोलन करू,” असा इशारा देखील त्यांनी दिला.