महापालिकेने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये अमेरिका, सिंगापूर, जर्मनीसह प्रमुख ३५ देशांमधील १५० कंपन्यांनी सहभाग नोंदवून स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी बुधवारी उत्सुकता दाखविली. शहराची वाहतूक, पाणी, ऊर्जा, तंत्रज्ञान आदी प्रश्नांवरील विविध प्रस्तावांचे तसेच प्रकल्पांचे सादरीकरण या प्रदर्शनात कंपन्यांकडून करण्यात आले.

महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विविध देशांचे राजदूत उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने दोन दिवसीय पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने पुढील पाच वर्षांत शहराला चोवीस तास पाणी पुरवठा प्रकल्प राबवला जाणार आहे. तसेच, नदी सुधारणा, सांडपाणी शुद्धीकरण, मेट्रो असे ३० हजार कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. या पाश्र्वभूमीवर शहराच्या नेमक्या काय गरजा आहेत याची माहिती महापालिकेच्या वतीने कंपन्यांना ई-मेलद्वारे कळविण्यात आली होती. या विषयाबाबत जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्या काय करू शकतात याचे सादरीकरण प्रदर्शनामध्ये करावे, अशी विनंती कंपन्यांना करण्यात आली होती. त्यानुसार विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन प्रस्तावांचे सादरीकरण बुधवारी केले.

कार्यक्रमात आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले, की शहराच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन वाहतूक, पाणी, तंत्रज्ञान, ऊर्जा, स्वस्तातील घरे आदी विषयांवर आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये कंपन्यांकडून त्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. अमेरिका, सिंगापूर, बेल्जियम, कोरिया, युके, जर्मनी आदी देशांच्या कंपन्यांनी त्यांचे तंत्रज्ञान व कल्पनांचे आदान-प्रदान या वेळी केले. महापालिकेने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनातून एकत्र झालेल्या माहितीचा उपयोग शहराच्या विकास कामांची अंमलबजावणी करताना केला जाणार आहे. नागरिकांना महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या दैनंदिन सुविधा आणखी चांगल्या प्रकारे कशा पुरविता येतील, या विषयावरही या कार्यक्रमाच्या निमित्ताने चर्चा झाली. घरांचा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे. त्या दृष्टीने घरे स्वस्तात कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील यासंबंधीच्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले.