पुणे : राज्यभरात आतापर्यंत ९ हजार २७७ खासगी बालवाड्या, पूर्वप्राथमिक वर्गांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यात सर्वाधिक १ हजार ४१० बालवाड्या, पूर्वप्राथमिक वर्ग पुणे जिल्ह्यातील आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार आता पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश पायाभूत स्तर म्हणून औपचारिक शालेय शिक्षणात करण्यात आला आहे. राज्यातील शासकीय अंगणवाड्यांसह खासगी बालवाड्या, पूर्वप्राथमिक वर्गांमध्येही राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात येणार आहे. त्यानुसार तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी बालवाटिका, बालवाटिका १, बालवाटिका २ या अभ्यासक्रमाची निर्मितीही करण्यात आली आहे.
मात्र, राज्यातील खासगी बालवाड्या, पूर्वप्राथमिक वर्गांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने खासगी बालवाड्यांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली. नोंदणीमध्ये सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापन, उपलब्ध भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिसंख्या याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. या खासगी बालवाड्या, पूर्वप्राथमिक वर्गांची नोंदणी एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली.
शिक्षण विभागाकडे १० जूनपर्यंत एकूण १५ हजार ६८ खासगी बालवाड्या व पूर्वप्राथमिक वर्गांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ९ हजार २७७ बालवाड्या, पूर्वप्राथमिक वर्गांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर ५ हजार ७९१ बालवाड्या, पूर्वप्राथमिक वर्गांची नोंदणी पूर्ण होणे प्रलंबित आहे. सर्वाधिक २ हजार ३३६ बालवाड्या पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी १ हजार ४१० बालवाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, तर ९२६ बालवाड्यांची नोंदणी पूर्ण होणे प्रलंबित आहेत.