पुणे : हडपसर भागात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन पसार झालेल्या सराइताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.
विनीत रवींद्र इंगळे (वय २४, रा. सातववाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वैमनस्यातून विनीत इंगळे, साथीदारांनी दीपक विजय कलादगी (वय २१, रा. पवार काॅलनी, हडपसर) याच्यावर २० मार्च राेजी तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. या घटनेत कलादगी गंभीर जखमी झाला होता. गेले चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. ३० जून रोजी इंगळे हा हडपसर भागातील लाेहिया गार्डनजवळ थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी महेश चव्हाण आणि अभिजित राऊत यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, निखिल पवार, भगवान हंबर्डे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने यांनी ही कारवाई केली.