पुणे : राज्यातील विविध भागांमध्ये बुधवारी संध्याकाळनंतर पावसाने हजेरी लावली. पुणे शहरात विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या तर सातारा जिल्ह्यात वाईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस झाला. पाचगणीमध्ये गारांच्या पावसाची नोंदही झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असून आजही (गुरुवार, १६ मार्च) पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> पिंपरीत बेकायदा वास्तव्य करणारा बांगलादेशी नागरिक गजाआड; आधारकार्डसह बनावट कागदपत्रे जप्त

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार बुधवारी (१५ मार्च) दिवसभर राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान राहिले. संध्याकाळनंतर पुणे, सातारा, ठाणे अशा भागांमध्ये तसेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. पाचगणी भागात गारांचा पाऊस झाल्याचे दिसून आले. राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक कमाल ३८.२ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची तर जळगावमध्ये १५.८ एवढ्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाने बुधवारी संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालात याबाबत माहिती दिली आहे.  आज (गुरुवार, १६ मार्च) कोकण आणि गोव्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट आणि मेघगर्जनेहस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल, असे हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजात नमुद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अमेरिकन पोलिसांकडून पुण्यातील तरुणीची सुटका; प्रेमविवाहानंतर धर्मांतर करण्यासाठी दबाव

पुण्यात पावसाची हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह कोथरुड, वारजे, कर्वेनगर, बाणेर, बावधन, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी नगर, बिबवेवाडी, धनकवडी, हडपसर, कोंढवा अशा भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. आजही (गुरुवार, १६ मार्च) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.