राज्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता

शुक्रवारी मुंबई, रत्नागिरी, अलीबाग, परभणी, चंद्रपूर या भागांत पावसाची नोंद झाली.

heavy-rain-alert-in-maharashtra-next-3-days-gst-97
राज्यात पुढील ३ दिवस महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा (Photo : File)

कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सरी

पुणे : राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. कोकण विभाग, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, पश्चिाम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. सध्या कोकण विभाग वगळता इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण विभागात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे. ६ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर कोकणासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी मुंबई, रत्नागिरी, अलीबाग, परभणी, चंद्रपूर या भागांत पावसाची नोंद झाली. कोकण विभागात ५ ते ६ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबरला काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात ६ सप्टेंबरनंतर प्रामुख्याने घाट विभागात पावसाचा जोर राहणार आहे. मराठवाड्यात ५ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारांची शक्यता आहे.

पाऊसभान…

कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत काही ठिकाणी ७ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६ आणि ७ सप्टेंबरला मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ आदी जिल्ह्यांतही काही भागांत ६, ७ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिाम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतही ६, ७ सप्टेंबरला काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rain likely to intensify again in the state akp