मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात राणा दाम्पत्यावरून घडलेल्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी मातोश्री बंगला मशीद आहे का? असा सवालही केला. तसेच मी मशिदीवर जोराने बांग लागली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा असं सांगितल्याचंही राज ठाकरेंनी नमूद केलं. ते रविवारी (२२ मे) पुण्यातील सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “मी सांगितलं होतं मशिदीवर जोराने बांग लागली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा. अनेक ठिकाणी हनुमान चालिसा लावली गेली. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असं म्हटलं. मातोश्री बंगला काय मशीद आहे का? मग ते मोठं प्रकरण झालं. त्यांना अटक झाली, ते तुरुंगात गेले, मधू इथं आणि चंद्र तिथे. यानंतर त्यांना सोडण्यात आलं.”

“शिवसैनिकांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही का?”

“शिवसेनेकडून राणा दाम्पत्याला वाट्टेल ते बोलण्यात आलं, राणा दाम्पत्य देखील वाट्टेल ते शिवसेनेला बोलत होते. एवढा सगळा राडा सर्वांना टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेत काम करणारे जे शिवसैनिक आहेत त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही का?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

हेही वाचा : “राज ठाकरेंनी सांगितलेल्या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या गंभीर कहाणीचा रचेता…”; काँग्रेसचा गंभीर आरोप

“हे सगळे ढोंगी, यांचं हिंदुत्व फक्त पकपक एवढ्यापुरतं”

“जे लोकं मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आले, ज्यांच्यामुळे एवढं प्रकरण घडलं त्यांच्याबरोबर राऊत लडाखमध्ये फिरत आहेत, खांद्यावर हात ठेऊन त्यांच्याशी बोलताय, त्यांच्यासोबत जेवत आहात. हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व फक्त पकपक एवढ्यापुरतंच आहे,” अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

“गुजरातमधून बाहेर काढलेल्या परप्रांतीयांबाबत कोण माफी मागणार?”

राज ठाकरे म्हणाले, “राज ठाकरेंनी माफी मागावी याची आत्ता जागा आली का? २०१७ मध्ये गुजरातमध्ये उत्तर प्रदेश बिहारमधले लोक कामासाठी गेले होते त्यापैकी कोणाकडून स्थानिक मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिथल्या उत्तर प्रदेश बिहारमधील नागरिकांना मारण्यात आले आणि १० ते १५ हजार लोकांना गुजरातमधून हकलून दिले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गुजरातमधून काढून दिलेले १० ते १५ लोक मुंबईमध्ये आले आणि मग परत उत्तर प्रदेशात गेले. तिकडे त्यांना मारण्यात आले, गुजरातमधून बाहेर काढण्यात आले तर तिथून कोण माफी मागणार आहे. म्हणून तुम्ही हे राजकारण समजून घेतले पाहिजे,” असेही राज ठाकरेंनी नमूद केले.