पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्या अनुषंगाने मंडल आणि जिल्हास्तरीय नियुक्त्यांची प्रक्रिया महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावी, अशाी सूचना चव्हाण यांनी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना बुधवारी केली. त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बाजू भक्कम करण्यासाठी सक्रिय राहा, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक बुधवारी पुण्यात झाली. पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर शहर; तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा चव्हाण यांनी घेतला. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील ग्रामीण आणि शहर अध्यक्षांकडून संघटनात्मक कामाची माहिती घेऊन काही सूचना केल्या.
‘ही बैठक संघटनात्मक पातळीवरील बैठक आहे. याचा निवडणुकीशी संबंध नाही. संघटनपर्वाचा अंतिम टप्पा सध्या सुरू असून मंडल आणि जिल्हास्तरीय नियुक्ती प्रक्रिया महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या कामात काही अडचण आहे का, हे जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे,’ असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, अन्य जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर चव्हाण यांनी पहिल्यांदाच भाजपच्या शहर कार्यालयाला भेट दिली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. चव्हाण यांनी शहर कार्यालयातच प्रमुख पदाधिकारी; तसेच नवनियुक्त मंडल अध्यक्षांशी संवाद साधला. त्यांना नियुक्तीपत्र आणि टॅब देण्यात आले. या वेळी संघटनात्मक पातळीवर काम वाढवा, येत्या २२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभराप्रमाणेच पुण्यातही रक्तदान शिबिराचे आयोजन करा, अशा सूचनाही चव्हाण यांनी केल्याची माहिती शहर पदाधिकाऱ्यांनी दिली.