पुणे : ‘मेळघाटात कुपोषणासारख्या गंभीर समस्येवर काम केले. आता मेळघाटातील कुपोषणाची समस्या नियंत्रणात आहे. सामाजिक कार्यातून सकारात्मक बदल साधता येतात. आज अनेक सामाजिक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतच नाही,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ‘आता युवकांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यायला हवे, सामाजिक कार्यात भाग घ्यायला हवा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. कोल्हे यांच्या हस्ते आर्टिस्ट्री या संस्थेच्या वतीने आयोजित ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या निमित्त डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांच्याशी डॉ. सावनी गोखले यांनी संवाद साधला. त्या वेळी डॉ. कोल्हे बोलत होते. संस्थेच्या अध्यक्षा वीणा गोखले उपस्थित होत्या.
मेळघाटात केलेल्या कामाचा दाखला देत डॉ. कोल्हे म्हणाले, ‘मेळघाट हा आदिवासीबहुल प्रदेश. त्यांची संस्कृती आजच्या शहरी संस्कृतीपेक्षा अधिक समृद्ध आणि प्रगत आहे. मेळघाटात आजही घरांना दार नाही. तिथे चोरी होत नाही. विवाहसंस्था लवचीक आहे. स्त्रियांना सन्मानाचे स्थान आहे. मात्र, या भागात अनेक सामाजिक आणि आरोग्याचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे होते.’
‘गेली चाळीस वर्षे या परिसरात काम करता आले. अनेकांना आरोग्य सेवा देता आली. त्याची परिणती कुपोषणाची समस्या कमी होण्यात झाली. त्याच काळात रोजगार हमीच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला. जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शेती बहरली. मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होऊ लागले. ज्या परिसरात कुपोषणामुळे हजार बालकांमागे २०० बालकांचे मृत्यू होत होते, तेथील मृत्युदर चाळीसपर्यंत कमी आला. मेळघाटात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या आणि नक्षलवादाची समस्या नियंत्रणात आहे,’ असेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
‘या’ अटींवर डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांचे लग्न
‘आमचे लग्न ठरवताना डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या चार अटी होत्या. चारशे रुपये महिन्यात संसार करायचा. रोज ४० किलो मीटर पायी चालण्याची तयारी ठेवायची. लग्न केवळ पाच रुपयांत होईल. वेळप्रसंगी निधी गोळा करण्यासाठी दारोदारी भटकायची तयारी ठेवावी लागेल, अशा अटी त्यांनी घातल्या होत्या. त्या मान्य केल्यानंतरच आमचे लग्न झाले,’ अशी आठवण डॉ. स्मिता कोल्हे यांनी सांगितली.
उपक्रमात काय?
‘देणे समाजाचे’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील सामाजिक संस्थांच्या कार्याची माहिती करून देण्यात येत असून, नवी पेठेतील निवारा सभागृहात १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती वीणा गोखले यांनी दिली. यंदा बीड, बुलडाणा, जळगाव, अकोला, मेळघाट, पुणे, जालना, सातारा, कोल्हापूर, अमरावती, इंदापूर इत्यादी परिसरातील २४ सेवाभावी संस्थांनी उपक्रमात सहभाग नोंदवला असून, सर्वांसाठी हा उपक्रम विनामूल्य खुला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.