पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत बुधवारपर्यंत राज्यभरातील १२ लाख ५ हजार ५७७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीनुसार पहिल्या नियमित फेरीच्या नोंदणीसाठी गुरुवारी (५ जून) दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी ही माहिती दिली. 

संपूर्ण राज्यात यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रियाऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यात ९ हजारांहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २० लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया २६ मेपासून सुरू करण्यात आली. ऑनलाइन नोंदणीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्याशिवाय शिक्षण विभागाने नोंदणी सुरू झाल्यावर इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशांच्या नियमातही बदल केला. त्यामुळे आधी नोंदणीसाठी दिलेली मुददत ५ जूनपर्यंत वाढवण्यात आली.

या पार्श्वभूमीवर, बुधवारपर्यंत राज्यभरातील १२ लाख ५ हजार ५७७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. यंदा दहावीच्या परीक्षेत १४ लाख ५५ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीसाठी किती विद्यार्थी नोंदणी करतात हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हानिहाय नोंदणी जिल्हानिहाय नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यातून १ लाख १४ हजार ९५३ लातूर जिल्ह्यातून २३ हजार ५४७, सोलापूर जिल्ह्यातून, ४२ हजार ९६९, नांदेड जिल्ह्यातून ३१ हजार ७,  अहिल्यानगर जिल्ह्यातून ४९ हजार ५५०, धाराशिव जिल्ह्यातून १४ हजार ९४३, सातारा जिल्ह्यातून ३० हजार २५४, रत्नागिरी जिल्ह्यातून १४ हजार ५४९, मुंबईतून १ लाख १९ हजार ५९२, ठाणे जिल्ह्यातून ९६ हजार ७१९, रायगड जिल्ह्यातून २९ हजार ९३, पालघर जिल्ह्यातून ३९ हजार ४७६, सांगली जिल्ह्यातून २८ जिल्ह्यातून १३९,  कोल्हापूर जिल्ह्यातून ३९ हजार २० सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७ हजार ५६८, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ४३ हजार ७९, वर्धा जिल्ह्यातून १२ हजार २७२, जळगांव जिल्ह्यातून ३७ हजार १४२, नागपूर जिल्ह्यातून ४० हजार ९७, अमरावती जिल्ह्यातून २६ हजार ३१६, नाशिक जिल्ह्यातून ६० हजार ७६७, अकोला जिल्ह्यातून १८ हजार १७७, गडचिरोली जिल्ह्यातून ७ हजार ९६८, यवतमाळ जिल्ह्यातून २५ हजार १११, बुलढाणा जिल्ह्यातून २९ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.