पुणे: राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आता त्याची स्वस्त आणि प्रभावी चाचणी शोधण्यासाठी संशोधन केले जाणार आहे. पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात हे संशोधन होणार आहे. याचबरोबर डेंग्यूच्या विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारणही केले जाणार आहे. यामुळे भविष्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने सहा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्लस्टरची स्थापन केली आहे. त्यात पुणे नॉलेज क्लस्टरचा समावेश आहे. याअंतर्गत बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यानंतर तातडीने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा… अजित पवारांच्या धरणग्रस्त वक्तव्यावर बोलणारे देवेंद्र फडणवीस त्याच धरणातील….. सुषमा अंधारे यांची चौफेर फटकेबाजी

राज्यात या वर्षभरात डेंग्यूचे ५ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यात प्रामुख्याने मुंबई, नागपूर आणि नाशिक महापालिकांच्या हद्दीत रुग्णसंख्या जास्त आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जाणार आहे. त्याचवेळी सांडपाणी तपासणीही केली जाणार आहे. सांडपाण्यात आढळणारे विषाणूचे अंश तपासले जातील. त्यामुळे संसर्गाची माहिती कळण्यासोबत तो कोणत्या विषाणूमुळे होत आहे, हेही कळेल.

सध्या डेंग्यूची तपासणी करण्यासाठी अनेक महागड्या चाचण्या आहेत. त्यातील प्रभावी आणि स्वस्त चाचणी कोणती यावर संशोधन केले जाणार आहे. यामुळे नागरिकांना भविष्यात प्रभावी चाचणी स्वस्तात करता येईल. – डॉ. राजेश कार्यकर्ते, राज्य समन्वयक, जनुकीय क्रमनिर्धारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमके काय होणार संशोधन

  • डेंग्यूच्या प्रभावी आणि स्वस्त चाचण्यांचा शोध घेणे
  • सांडपाण्यातून विषाणूंचे अंश शोधणे
  • जनुकीय क्रमनिर्धारणातून विषाणूचे वेगवेगळे प्रकार शोधणे
  • विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण झाल्यानंतर त्यावर लस बनविणे शक्य