पुणे : भूमी अभिलेख विभागामध्ये गेल्या चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू असल्याची कबुली देऊन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सरकारला घरचा आहेर दिला. ‘भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराची तपासणी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्याबरोबर जमाबंदी आणि नोंदणी अधिनियम कायदे कालबाह्य झाले आहेत. त्या कायद्यातील दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

भूमी अभिलेख विभागातील जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांच्या कारभाराबद्दल गंभीर तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याची सविस्तर चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी जमाबंदी आयुक्तालयाच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार लवकरच विशेष पथकाची स्थापना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले, ‘भूमी अभिलेख विभागात गेल्या चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे. या घोटाळ्याचा आकार खूप मोठा आहे. या विभागातील अधिकारी मोरे, पाटील यांनी आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या पद्धतीने जमिनीच्या नकाशात फेरफार केले आहेत. अमुक एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याची जमीन तिसऱ्या नावावर करण्याचे प्रकार केले आहेत. चुकीचे ले आउट पाडण्यात आले आहे. त्यावर इमारती बांधल्या गेल्या. त्याला महापालिकेने परवानग्या दिल्या आहेत. एक नकाशा चुकला, तर त्याचे परिणाम कित्येक पिढ्यांवर होतात.

ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडून अर्ज मागविले जाणार आहेत. येत्या १७ आणि १८ मे रोजी हे शिबिर घेतले जाणार आहे. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी या चौकशी पथकाचा भाग करावा लागणार आहे. सातबारा, फेरफार यांच्यात दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. चुका दुरुस्त करताना विविध कायदे वापरावे लागणार आहेत. असे चुकीचे काम करणारे अधिकारी हवेत कशाला, असे स्पष्ट करून या अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भूमी अभिलेख विभागाचा कारभार सुधारण्यासाठी काही कृति आराखडा आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘जमाबंदी, नोंदणी अधिनियमातील काही कायदे बदलावे लागतील. काही कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करावे लागतील. याबाबत जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांना सूचना केली आहे.’

२० ते ४० वर्षे अधिकारी पुणे, मुंबईतच

भूमी अभिलेख विभागातील काही अधिकारी २० ते ४० वर्षे पुणे, मुंबईतच ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांच्या नकाशावर विदर्भ किंवा अन्य जिल्हे नाहीत, अशी कबुली बावनकुळे यांनी दिली. या विभागातील बदल्यांच्या पद्धती आणि कायमस्वरूपी या शहरांमध्ये राहण्याच्या प्रवृत्तीमुळे अधिकाऱ्यांमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची प्रवृत्ती वाढल्या असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.