पुणे : रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्याने झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाचा दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या मित्राने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात घडली. पसार झालेल्या दुचाकीस्वारासह साथीदारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.

किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी मुकील गफूर शेख (रा. कोंढवा), अरबाज मेहबूब शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली. रिक्षाचालक किरण याचा भाऊ मधुकर याने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण, त्याचा भाऊ मधुकर, बंटी कसबे आणि मित्र भापकर चौकातील पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार मुकील याला रिक्षाचा धक्का लागला. या कारणावरून रिक्षाचालक किरण आणि दुचाकीस्वार मुकील यांच्यात वाद झाला. आरोपी मुकील, त्याचा मित्र अरबाज यांनी किरण याला मारहाण केली. एका आरोपीने किरणच्या छातीवर लाथ मारली. मारहाणीत किरण बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आरोपी मुकील आणि अरबाज पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दोघांना अटक करण्यात आली.

हेही वाचा – चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे सर्वांत श्रीमंत! ‘इतकी’ आहे मालमत्ता

हेही वाचा – पुणे : तळजाईच्या जंगलात बांधकाम व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक एस. टी. जगदाळे तपास करत आहेत.