प्रथमेश गोडबोले prathamesh.godbole@expressindia.com
बारावीनंतर नोकरी करत असतानाच आवडीचा छंद जोपासण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत बेकरीचा अभ्यासक्रम शेरॉन म्हस्के या तरुणाने पूर्ण केला. केक तयार करण्याची आवड असल्याने नोकरी सोडून मोठय़ा केकच्या दुकानांमध्ये इंटर्नशिप केली. स्वत:चा व्यवसाय सुरू करायची जिद्द ठेवून रोझ ऑफ शेरॉन नावाची कंपनी स्थापन करून घरगुती स्वरूपात केक तयार करण्यास सुरुवात केली. भांडवलाची कमतरता, जाहिरात करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने केवळ मित्रांच्या साहाय्याने आणि मौखिक प्रचाराद्वारे शेरॉन यांनी व्यवसायात जम बसवला आहे. ते स्वत: घरी विविध प्रकारचे केक तयार करून ग्राहकापर्यंत पोहोचवतात. पुणे, नगर, मुंबई अशा विविध शहरांमध्ये त्यांची उत्पादने पोहोचली आहेत.
पुण्यात केकची दुकाने कमी नाहीत. देशपरदेशातील वेगवेगळ्या प्रांतातील विविध चवींचे केक मिळणारी ठिकाणेही सर्वत्र आहेत. असे असले तरी आपल्या प्रियजनांच्या वाढदिवशी, आनंदाच्या क्षणी आपल्या कल्पनेनुसार हव्या त्या चवीचे हटके केक मिळतीलच असे नाही. या कल्पनेतून आणि केक तयार करण्याची आवड असल्याने शेरॉन म्हस्के यांनी २०१५ मध्ये रोझ ऑफ शेरॉन नावाने कंपनी स्थापन केली. अगदी घरगुती स्वरूपात ग्राहकांची मागणी, त्यांच्या कल्पनेनुसार आणि हव्या त्या चवीमध्ये केक तयार करून देण्याची हातोटी शेरॉन यांनी जोपासली आहे. मिक्स फ्रुट, चॉकलेट केक ही दोन उत्पादने त्यांच्या कंपनीची वैशिष्टय़े आहेत. बारावीनंतर घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी काही वर्षे नोकरी केली. नोकरी करत असतानाच आपला छंद जोपासण्यासाठी त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयातून बेकरीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनुभव मिळण्यासाठी त्यांनी कोरेगाव पार्क येथील केक अॅण्ड क्रीम या केक तयार करणाऱ्या मोठय़ा दुकानात इंटर्नशिप केली. त्यानंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ आपला छंद जोपासण्यासाठी शेरॉन यांनी डब्लू. एस. बेकर्स येथे काही काळ नोकरी केली. नोकरी करण्यापेक्षा आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असा विचार करीत त्यांनी व्यवसायाला प्रारंभ केला.
बाजारात आणि गल्लोगल्ली केकची मोठी दुकाने असताना घरगुती स्वरूपात तयार केलेली उत्पादने विकत घेणार कोण?, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. जाहिरात करण्यासाठी, भांडवल उभे करून दुकान उघडण्यासाठी जवळ पुरेसे पैसे नव्हते. मात्र, अशा परिस्थितीतही खचून न जाता आपल्या मित्रांच्या साहाय्याने त्यांनी घरगुती तयार केलेले केक अनेकांना चवीसाठी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू मागणी वाढत गेली.
‘जे खाण्याचे शौकीन असतात ते आपल्या आवडीच्या पदार्थासाठी काहीही करू शकतात. मनपसंत खाण्यासाठी माणूस कोसो दूर प्रवास करू शकतो, हे व्यवसाय करताना प्रकर्षांने मला जाणवले. पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये केकची अनेक मोठी दुकाने आहेत. परंतु, आपल्याला हवा तसा केक मिळण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक उत्तम आणि चविष्ट केक शोधत असतातच. मात्र, त्यापासून अनभिज्ञ असलेल्यांसाठीच व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आधी बाजारातील स्पर्धा, निरीक्षण, त्यातील बारकावे समजून घेतले. केक सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे वयानुसार बदलणाऱ्या आवडींचा अभ्यास करून आणि मागणीनुसार केक तयार केले जातात,’ असे शेरॉन सांगतात.
वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा वर्षांतून एकदा येणाऱ्या दिवसाबरोबरच हल्ली लग्न, साखरपुडा, छोटीशी केक पार्टी असे विविध कार्यक्रम आणि कारणांसाठी केकची मागणी वाढत आहे. केकच्या किमती या त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साधन-सामग्रीवर आधारित आहेत. अर्धा किलो केकची किंमत तीनशे ते आठशे रुपयांपर्यंत आहे. कंपनीला वेगळी चव, डिझाइन आणि भन्नाट केकच्या कल्पकतेमुळे मागणी वाढत आहे. केकसाठी आवश्यक कच्चा माल बाजारातून आणल्यानंतर शेरॉन स्वत: घरी केक तयार करतात. मागणी मोठय़ा प्रमाणात असेल, तर त्यांची मैत्रीण तुलसी पाटील या शेरॉन यांना केक तयार करण्यासाठी सहकार्य करतात. बेकरी अभ्यासक्रम करताना तुलसी या शेरॉन यांच्यासोबत होत्या. लहान मुलांच्या वाढदिवसाकरिता विविध प्रतिकृतींचे केक तयार केले जातात. तर, लग्नाचा वाढदिवस, हॉटेलचे उद्घाटन व वर्धापन दिन, लग्न व साखरपुडा अशा विविध कार्यक्रमात प्रसंगानुरूप केकचा आकार, चव बदलत जाते.
‘केक तयार करण्याचा छंद असल्याने छंदाचे रूपांतर व्यवसायात केल्यामुळे पालकांनीही पाठिंबाच दिला आहे. व्यवसायात आता चांगला जम बसला असून मागणी देखील वाढत आहे. सध्या कोरेगाव पार्क येथील घरातूनच कंपनीची उत्पादने मागणी येईल, त्यानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात. येत्या वर्षभरात घराजवळच एक दुकान सुरू करण्याचा मानस आहे,’ असेही शेरॉन सांगतात.