पुणे : रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत कौटुंबिक वादामुळे घरातून पळून आलेल्या १४ अल्पवयीन मुलांना दोन दिवसांध्ये पुणे रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. ही सर्व मुले घरी न सांगता पळून आलेली असून रेल्वे स्थानकावर राहत होती. या मुलांना समुपदेशनासाठी ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीच्या (चाईल्ड वेल्फेअर कमिटी) केंद्रात ठेवण्यात आले आहे. समुपदेशानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

आरपीएफचे निरीक्षक सुनील यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे स्थानकात, चाइल्ड हेल्पलाइन पुणे आणि स्थानिक समाजसेवी संस्था यांच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ या संयुक्त मोहिमेंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी (१९ सप्टेंबर) गस्त घालत असताना आठ अल्पवयीन मुले पालकांच्या अनुपस्थितीत आढळून आली. त्यातील तीन मुले फलाट एक, दोन आणि चारवर ही मुले वारंवार भटकत असून त्यांची चौकशी केली असताना मुलांकडून संबंधित माहिती प्राप्त झाली.’

‘मित्रांच्या सांगण्यावरून पालकांना न सांगताच घर सोडून आलो असल्याचे यातील काही मुलांनी सांगितले, तर काहींनी कौटुंबिक कारणे सांगून घरातून पळ काढला असल्याचे सांगितले. ही मुले एकाच दिवशी आढळून आल्याने तातडीने त्यांच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधण्यात आला. त्यानंतर येरवडा येथील बाल कल्याण समिती येथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यापैकी सात मुलांना साथी सेवा या खासगी बाल कल्याण संस्थेत ठेवण्यात आले आहे, तर एक मुलाला साई सेवा ओपन शेल्टर या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या मुलांची वैद्यकीय तपासणी, समुपदेशन करून या मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे यादव यांनी सांगितले.

शनिवारी सहा मुले सापडली

दोन दिवसांपूर्वी आरपीएफने राबविलेल्या मोहिमेंतर्गत आठ अल्पवयीन मुले आढळून आली असताना, शनिवारी (२० सप्टेंबर) आणखी सहा मुले पुणे रेल्वे स्थानकावर आढळून आली. या मुलांना ताब्यात घेऊन सामाजिक संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. या मुलांचे समुपदेशन करून त्यांच्या पालकांची माहिती काढण्यात येत आहे. पालकांसोबत संपर्क होताच त्यांना चौकशीअंती सर्व प्रक्रिया पार पाडून त्यांचा ताबा पालकांकडे पुन्हा देण्यात येईल, असेही आरपीएफ निरीक्षक यादव यांनी सांगितले.

आरपीएफ आणि जीआरपी तसेच खासगी सामाजिक सेवा संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांच्या शोधार्थ ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ही मोहीम राबविण्यात येते. दोन दिवसांत १४ अल्पवयीन मुले कौटुंबिक कारणास्तव न सांगताच घरातून पळून आली असल्याचे समोर आले. या मुलांचे समुपदेशन केले जाईल. मात्र, पालकांनी वेळोवेळी पाल्यांची काळजी घ्यावी.प्रियांका शर्मा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, पुणे विभाग