Medha Kulkarni on Pune Shaniwar Wada Namaz Row : पुणे शहरातील शनिवारवाड्यात दोन दिवसापूर्वी काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भाजपा नेत्या तथा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शनिवारवाड्यात प्रवेश केला. मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमज पठण केलं होतं त्या जागेवर गोमूत्र शिंपडलं आणि ती जागा शेणाने सारवली. तसेच सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी शिववंदना केली. यासह मेधा कुलकर्णी व त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्याची मागणी केली.

यावरून मेधा कुलकर्णी यांच्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीका केली आहे. त्यापाठोपाठ त्यांच्याच मित्रपक्षांनी देखील त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासह त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मेधा कुलकर्णी यांना समज द्यावी असंही सुचवलं आहे.

मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून कारवाई करा : रुपाली ठोंबरे

रूपाली ठोंबरे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या अशिक्षित बाईने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यांच्या या नौटंकीमुळे पुण्यात हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होत आहे. समाजातील सामाजिक सलोखा बिघडतोय. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे.

“पेशवे मेधा कुलकर्णींना शिव्या-शाप देत असतील”

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “आपल्या धर्माचा स्वाभिमान असणं ही वेगळी गोष्ट आणि दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावणं वेगळं. आपल्या धर्माचा प्रत्येकाला स्वाभिमान असायला पाहिजे. परंतु, ते करत असताना दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावत असतील तर तो कायद्याने गुन्हा आहे. मेधा कुलकर्णी यांचं कृत्य बेकायदेशीर आहे. मेधा कुलकर्णी शिक्षिका असल्या तरी त्यांना ही गोष्ट माहीत नसेल की शनिवार वाडा हे मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक आहे. शनिवारवाडा मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या बुरसटलेल्या बुद्धीचं प्रतीक नाही. ते पेशवे सुद्धा आज वरून मेधा कुलकर्णी यांना शिव्या शाप देत असतील.”